मुंबई : राजधानी मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या सागरी किनारा मार्गाच्या (Coastal Road) प्रकल्पात आता एका संगीतमय अध्यायाची भर पडली आहे. कोस्टल रोडवर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘म्युझिकल रोड’ (Musical Road) या अभिनव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिमाखात लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे आता मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रवास केवळ वेगवानच नव्हे, तर अतिशय आनंददायी आणि मनोरंजक ठरणार आहे. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असलेला हा रस्ता एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आला आहे. जेव्हा एखादे वाहन या रस्त्यावरून ठराविक गतीने धावते, तेव्हा टायर्स आणि रस्त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या पट्ट्यांच्या घर्षणामुळे एक सुरेल धून किंवा संगीत निर्माण होते. प्रवाशांना रस्ते सुरक्षेचे नियम पाळण्यास प्रवृत्त करणे आणि प्रवासाचा थकवा दूर करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच मुंबईत राबवण्यात आला असून, जागतिक स्तरावर मोजक्याच देशांमध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांमधील या आधुनिक बदलाचे कौतुक केले.
प्रवाशांसाठी नवीन आकर्षण कोस्टल रोडवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हे आता एक मोठे आकर्षण ठरणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात चालकाचे लक्ष विचलित होऊ नये आणि त्यांना सतर्क ठेवण्यासाठी संगीताची ही साथ उपयुक्त ठरेल. या रस्त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात आणि आधुनिकतेत आणखी एक भर पडली असून, आगामी काळात हा म्युझिकल रोड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गावर (Coastal Road) सुरू करण्यात आलेल्या ‘म्युझिकल रोड’ प्रकल्पाबाबतची सर्वात मोठी उत्सुकता आता संपली आहे. या संगीतमय मार्गावरून जाताना प्रवाशांना नेमके कोणते संगीत ऐकू येणार, याचे गुपित उघड झाले आहे. ऑस्कर विजेता चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’ मधील जगप्रसिद्ध ‘जय हो’ या गीताची धून या रस्त्यावर वाहने धावताना ऐकू येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा अभिनव उपक्रम माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या कल्पनेतून साकार झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने या ‘मेलडी रोड’चे विशेष पट्टे कोस्टल रोडच्या एका विशिष्ट टप्प्यावर बसवले आहेत. नरिमन पॉईंटच्या दिशेने वरळीकडे जाणाऱ्या उत्तरेकडील मार्गावर हा संगीतमय अनुभव प्रवाशांना घेता येईल. सागरी बोगद्यातून (Tunnel) बाहेर पडल्यानंतर साधारणपणे ५०० मीटर लांबीच्या पट्ट्यांवर हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. त्यामुळे बोगद्यातील शांत प्रवास संपवून बाहेर येताच प्रवाशांचे स्वागत ‘जय हो’च्या स्फूर्तीदायी सुरावलींनी होणार आहे.







