नवी दिल्ली : देशातील पहिली हाय-स्पीड रेल्वे अर्थात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२७ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरत ते वापी दरम्यान सुरू केला जाणार असून, त्यानंतर मुंबईपर्यंतचा संपूर्ण मार्ग टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून सप्टेंबरअखेर ४५६ किलोमीटर पियर, ३७१ किलोमीटर व्हायडक्ट, २९९ किलोमीटर पट्ट्यात सहा लाख ध्वनीरोधक आणि २०६ किलोमीटर व्हायडक्टवर ९३०० ओएचई मास्ट्स बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, चार डोंगराळ बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून २१ किलोमीटर लांबीच्या मुख्य बोगद्यापैकी ५ किलोमीटरचा भाग डोंगराळ पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तसेच आठ स्थानकांवरील नागरी बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या वास्तुशिल्पीय सजावटीचे काम सुरू आहे. साबरमती, सुरत आणि ठाणे येथील रोलिंग स्टॉक डेपोचे कामही प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रातील २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी ७ किलोमीटरचा भाग ठाणे खाडीखालून जाणार असून, हा भारतातील पहिला समुद्राखालचा रेल्वे बोगदा ठरणार आहे. जुलै २०२६ मध्ये विक्रोळी आणि सावली येथून अत्याधुनिक टनल बोरिंग मशिन्स कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ५०८ किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमधून जाणारा हा मार्ग मुंबई आणि अहमदाबाद या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणार आहे. जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित ही बुलेट ट्रेन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार असून, देशात हाय-स्पीड रेल्वेची पायाभूत सुविधा विकसित करण्यासही मदत करणार आहे. २०२७ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर देशभरात प्रस्तावित आणखी सात हाय-स्पीड रेल्वे मार्गांच्या विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे.

