मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रस्तावित सेंट्रल पार्क प्रकल्पात मोठा बदल करण्यात आला असून, आता या ठिकाणी केवळ उद्यान विकसित करण्यात येणार आहे. भूमिगत इनडोअर क्रीडा सुविधा, जिम, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉल उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सुधारित आराखड्याला मंजुरी दिली असून, १२० एकर जागेवरील उद्यान विकसित करण्याची जबाबदारी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सहकार्याने महापालिकेने महालक्ष्मी रेसकोर्सच्या २११ एकरपैकी १२० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाला मार्च २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सदस्यांनीही बहुमताने या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. सुरुवातीच्या आराखड्यात जमिनीवर हरितक्षेत्र, वृक्षलागवड, आसनव्यवस्था आणि ॲम्फी थिएटर, तर भूमिगत भागात इनडोअर क्रीडा सुविधा, जिम, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉल उभारण्याचे नियोजन होते. मात्र, अलीकडील बैठकीत भूमिगत बांधकामाचा प्रस्ताव पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. आता संपूर्ण जागा खुल्या स्वरूपातील हरित उद्यान म्हणून विकसित केली जाणार असून, झाडांची लागवड, हरितक्षेत्राचे नियोजन आणि नागरिकांसाठी खुल्या सुविधा याबाबत उद्यान विभाग लवकरच आराखडा तयार करणार आहे. भूमिगत बांधकामांना १०० हून अधिक वास्तुविशारदांनी विरोध दर्शवत महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. रेसकोर्सची जागा ही सार्वजनिक असून येथे उत्खनन केल्यास पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, तसेच नागरिकांच्या मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठीच्या जागेवर परिणाम होईल, अशी त्यांची भूमिका होती. महापालिकेने या आक्षेपांची दखल घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मरीन ड्राइव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावर ५३ हेक्टर क्षेत्रात हरितक्षेत्र विकसित करण्याचे कामही सुरू असून, त्यामध्ये निसर्ग उद्याने, सायकल ट्रॅक, क्रीडांगणे, सांस्कृतिक स्थळे आणि मुलांसाठी विविध सुविधा उभारल्या जाणार आहेत. महालक्ष्मी सेंट्रल पार्कच्या मूळ आराखड्यावरून विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी सरकारवर टीका केली होती. भूमिगत पार्किंग आणि अन्य बांधकामांना त्यांनी सातत्याने विरोध दर्शवला होता.

