ठाणे : नागरिकांना विविध शासकीय सेवा, सरकारी योजनांची माहिती आणि तक्रार निवारणाची सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने अधिकृत व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेली ही डिजिटल सेवा ‘Thane Doorstep Delivery Portal’ शी जोडण्यात आली असून, यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. मोबाईलवरील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विविध शासकीय सेवांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि अर्जाची सद्यस्थिती सहज पाहता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी +९१ ८९९९१ ५४१४० हा अधिकृत क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून व्हॉट्सअॅपवर ‘Hi’ किंवा ‘नमस्कार’ असा संदेश पाठवायचा आहे. त्यानंतर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडून उपलब्ध पर्यायांमधून आवश्यक सेवा निवडता येणार आहे.
या चॅटबॉटद्वारे जिल्हा परिषदेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच अर्जाची सद्यस्थिती (Application Status) थेट मोबाईलवर तपासता येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी, आरोग्य, नागरी सुविधा किंवा इतर समस्यांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे सर्व स्तरांतील नागरिकांना तिचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. या डिजिटल उपक्रमामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढण्याबरोबरच नागरिकांचा वेळ, पैसा आणि कार्यालयीन फेऱ्यांची बचत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

