मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासन व युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली यांच्यात उर्जा क्षेत्रातील संशोधन व धोरण विकासासाठी सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्रात संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला गती मिळणार आहे. यामार्फत उर्जेचा स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारा पुरवठा, ऊर्जा साठवणूक उपाय, वीज बाजार रचना, ग्रिड प्रसारण प्रणालीतील सुधारणा, हवामानाशी जुळवून घेणारी धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये संयुक्त काम होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या संस्थेच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन आणि नवसंशोधनाला चालना मिळेल. या सामंजस्य करारामार्फत उर्जा साठवणूक, वीज बाजार, प्रसारण व्यवस्था आणि हवामान बदलाशी जुळवून घेणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धी यांना चालना मिळणार आहे. स्वच्छ, विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने सहकार्याचा नवा अध्याय सुरू होत आहे.” महाराष्ट्र शासन व युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली यांच्यातील हे सहकार्य परस्पर विश्वास, समानता आणि सामूहिक हिताच्या तत्त्वांवर आधारित असून राज्याच्या उर्जा क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्थानिक उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि प्रशासन यांना नवसंशोधन, क्षमता वृद्धी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहेत. त्यामुळे पर्यावरणस्नेही आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने राज्याचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. हा करार लवचिक स्वरूपाचा असून भविष्यातील प्रकल्पांनुसार सहकार्याची दारे खुली ठेवतो. यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे व प्रशासन यांना नवसंशोधन, क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षणाच्या संधी लाभणार आहेत.
सामंजस्य करारातील मुख्य सहकार्याची क्षेत्रे :
- स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या वीजेचा विकास
- उर्जा साठवण तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन
- वीज मार्केटची रचना आणि धोरण निर्मिती
- ग्रिड प्रसारण क्षेत्रातील नवोन्मेष
- हवामान अनुकूलता (climate resilience) उपाययोजना
- कौशल्यविकास आणि प्रशिक्षण उपक्रम







