नाशिक : नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात आज भरदुपारी सुर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटीक शोचे. या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले. याबरोबरच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने गंगापूर धरण परिसर आज दुपारी दुमदुमला. तसेच सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करीत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार मानले. भारतीय वायूदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसीय एरोबॅटिक शो आज दुपारी गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल (जालना), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त), ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय वायू दलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी आज दुपारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. धरणाच्या सभोवताली नागरिक उपस्थित होते. हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, श्री. विष्णू, अंकित वशिष्ट, संजय सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह, अभिमन्यू त्यागी यांनी वायू दलातील हॉक १३२ या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वाय, मिग विमान, बाण, प्रेमाचे प्रतिक साकारत नाशिककरांना समर्पित केले. तत्पूर्वी देशभक्तीपर विविध गीतांमुळे परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी, नाश्ता, स्वच्छता, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्र, स्वयंसेवक, लाइफ जॅकेट, थ्रो बॅग्जसह आवश्यक साधने, उपकरणांनी सज्ज होता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते. तर कार्यक्रमापूर्वी ऑल्मपिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकानयनची प्रात्यक्षिके सादर केली. मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, डोळ्यांचे पारणे फेडणारा अशा एरोबॅटिक शोसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण होऊन ते सैन्य दलात भरतीसाठी प्रवृत्त होतील. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याची ही पूर्वतयारी म्हटली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, नाशिक शहरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नाशिकच्या वैभवात भर पडून नाशिकचा नावलौकिक उंचावणार आहे.






