मुंबई : ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी शाळा – महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन कोऱ्या बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना राज्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो.
अर्थात, यावेळी एसटी महामंडळाकडे असलेल्या नवीन बस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. राज्यभरात एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते एक हजार बस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.







