मुंबई : आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून अंधेरीतील व्यावसायिकाच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश करून त्याचे अपहरण करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, आरोपींनी बनावट शासकीय ओळखपत्रांचा वापर करून कारवाईचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राजकुमार कंडासामी (४९) यांच्या कार्यालयात सहा पुरुष आणि तीन महिलांसह एकूण नऊ जणांचा समूह आला होता.
आपण आयकर विभाग तसेच क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्रांच्या माध्यमातून भासवत त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर कंडासामी आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण करण्याची धमकी दिली. तसेच कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन काढून घेऊन त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मज्जाव केला. कायदेशीर कारवाईची भीती दाखवत आरोपींनी शिवीगाळ केली आणि कारवाई टाळण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर राजकुमार कंडासामी यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात नऊ अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहा आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष उदय खोपटकर (३७), विनय रमेश मोरे (३७), प्रेम किशन सबनानी (५०), प्रज्ञा हरीश माईन (२७) आणि रेश्मा शामराव वारंग (४१) सबीना हफिज शेख (४८) या आरोपीचा समावेश आहे. आरोपींनी बनावट शासकीय ओळखपत्रांचा वापर करून व्यावसायिकाच्या कार्यालयात प्रवेश केला आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू असल्याचा बनाव केला. या टोळीतील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख आणि परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





