पालघर : वसईतील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर दरम्यान असलेल्या चार मजली ‘रमाबाई अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग बुधवारी कोसळला होता. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झालाय. बचावकार्य अजूनही सुरू असल्याची माहिती एनडीआरएफनं दिली. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर यांनी गुरुवारी सकाळी या घटनेतील मृतांची संख्या १५ वर पोहोचल्याची पुष्टी केली.
पालघर जिल्ह्यातील वसई विरारमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली. ही घटना बुधवारी घडली असून, यात आतापर्यंत १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या भागात अजूनही बचावकार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मलबा असल्यानं अनेकजण या मलब्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वसई- विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी भेट देवून तेथे सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर पाहणी केली. आयुक्तांनी घटनास्थळी उपस्थित NDRF टीम, अग्निशमन कर्मचारी यांच्याबरोबर बचावकार्यासंबंधी विविध बाबींवर चर्चा करून लवकरात लवकर बचावकार्य पूर्ण करण्यासंबंधी सूचना दिल्या.
विरार पूर्व येथे असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या इमारतीत झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. तर या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत १५ वर्षं जुनी होती आणि पालिकेनं इमारतीला नोटीसही दिली होती. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या इमारतीत २५ ते ३० कुटुंब राहत होते. त्यापैकी ३० लोक अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. बुधवारी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्याचवेळी इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. त्यामुळं रहिवासी आणि वाढदिवसाला आलेले पाहुणे ढिगाऱ्याखाली अडकले होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यापुढे बचावकार्य सुरू करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.