पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे. आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देविदास परशुराम नावळे इयत्ता दहावी राहणार मूळचा मोखाडा बीवळपाडा आणि मनोज सिताराम वड इयत्ता नववी राहणार दापटी या दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर शाळेचा सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजुला गस्त घालत असताना त्यांना झाडाला काहीतरी लटकत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी जवळ जावून पाहणी केली तेव्हा दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकांनी याबाबत तात्काळ मुख्यध्यापक, अधीक्षक व इतर शिक्षकांना याची माहिती दिली. कपडे सुकवण्यासाठी असलेल्या रस्सीला गळफास घेतला असून मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय येण्याआधीच शाळा प्रशासनाने मृतदेह खाली उतरवल्याने कुटुंबीयांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. जव्हारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक आणि पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असलं तरी यामुळे संबंधित विभागांवर मात्र आता पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.