मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूर वाशी नका परिसरातील कालीमाता मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरी चे कपडे घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून काली माता भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांना भाविकांच्या तक्रारीवरुन मंदिरातील पुजाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालीमातेच्या मंदिरात मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत मंदिरातील पुजाऱ्याला विचारणा केली. देवी माझ्या स्वप्नात आली मदर मेरीचे रुप देण्यास सांगितले असे त्याने सांगितले. यावर काही संघटनानी आक्षेप घेत आरोपी रमेश भटजीला आरसीएफ पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमागे मिशनऱ्यांकडून पैसे दिल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत. या संबंधित अजून कोण दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.







