मुंबई : मुंबईतील पवईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई उपनगर पवईतील आरए स्टुडिओमध्ये एका तरुणाने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवलं. स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग आणि ऑडिशन्स सुरू असताना ही घटना घडली. खिडक्यांमधून मुलांना बाहेर डोकावताना पाहून जवळच्या लोकांमध्ये खळबळ उडाल्याच पाहिला मिळालं. या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर यामी गौतमीचा थर्सडे चित्रपटाची आठवण झाली आहे. योगायोग आज थर्सडेदेखील आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला ज्यात तो जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलांसाठी ऑडिशन्स सुरू होते. युट्यूबर असल्याचा दावा करणारा रोहित आर्य नावाचा तरुण या ऑडिशन्स घेत होता. त्याने आज सकाळी सुमारे १०० मुलांना ऑडिशन्ससाठी बोलवलं होतं. दुपारी १ वाजेपर्यंत त्याने सुमारे ८० मुलांना घरी पाठवलं होतं, तर उर्वरित १७ मुलांना एका खोलीत बंद केलं होतं. जेव्हा मुलं आवाज करू लागली आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावू लागली तेव्हा लोकांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या अनेक पथकं घटनास्थळी पोहोचली. स्टुडिओला घेराव घालण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. मुलांची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे असे पोलिसांनी माध्यमांना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली आहे. नंतर, आरोपी रोहितने एक व्हिडीओ जारी केला ज्यामध्ये तो दहशतवादी नाही आणि पैशासाठी हा गुन्हा केला नाही असं सांगितलं आहे. पण, त्याला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्याने असंही म्हटलंय की त्याने हे कृत्य काळजीपूर्वक नियोजन करून केलंय. रोहितने व्हिडीओमध्ये धमकी दिली की जर त्याला उत्तरे मिळाली नाहीत तर काहीही होऊ शकतं. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे. घटनेची बातमी पसरताच, मुलांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी स्टुडिओबाहेर जमली. अनेक पालक त्यांच्या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसले पण त्यांना आत जाऊ दिले नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस दल बोलावण्यात आले. परिसरात हाय अलर्ट देखील जाहीर करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित (३०) हा स्टुडिओमध्ये तात्पुरते काम करत होता आणि सोशल मीडियावर एक अभिनय चॅनेल चालवतो. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. त्याची ओळख, हेतू आणि संभाव्य साथीदारांबद्दल माहिती गोळा केली जात आहे.







