ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाटाची लांबी वाढवण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढवली जाणार आहे. नवीन वर्षामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावरून १२ ऐवजी १५ डब्यांची लोकल धावणार आहे. त्यामुळे ठाण्यातून मुंबई आणि कर्जत- कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढणार आहे. प्रवाशांची गर्दी आणि लोकलवरील वाढता ताण लक्षात घेता फलाटाची लांबी वाढवण्यात येणार आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मवरून आता १२ डब्यांच्या ऐवजी १५ डब्यांची लोकल धावणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज पाहता मध्य रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ ची रुंदी १६.१५ मीटरने वाढण्यात येणार आहे. तर फलाट क्रमांक ३ आणि ४ ची रुंदी ४० मीटरने वाढण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून डिसेंबर २०२५ पर्यंत ही कामं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्याचा प्रवास गर्दीमुक्त होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.







