मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने पोलिस चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी लीलावती रुग्णालयामध्ये गेला होता. जवळपास अर्धा तास तो रुग्णालयामध्ये होता. बाबा सिद्दिकी यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे कळताच तो रुग्णालयातून बाहेर पडला आणि पळून पुण्याला गेला. मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम हा बाबा सिद्दिकी यांचे निधन झाल्याची खात्री करण्यासाठी लीलावती रुग्णालयात गेला होता. जवळपास ३० मिनिटं शिवकुमार गौतम लीलावती रुग्णालयाजवळच होता. बाबा सिद्दिकी यांची तब्बेत अत्यंत चिंताजनक असून वाचण्याची शक्यता धूसर असल्याची खात्री पटल्यानंतरच शिवकुमार तिथून निघून गेला. त्यानंतर रिक्षाने तो कुर्लाला गेला तिथून ठाण्याला लोकलने गेला आणि ठाण्यावरून एक्स्प्रेसने पुण्याला रवाना झाला.
मोबाईलवरील बातम्यांमधून शिवकुमारला बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची बातमी समजली. गोळीबारानंतर शिवकुमारने शर्ट बदली केला आणि घटनास्थळी देखील तो जवळपास २० मिनिटं तमाशा बघत होता. प्लॅनिंगनुसार शिवकुमार हा धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह या दोन शूटरला उज्जैन रेल्वे स्थानकात भेटणार होता. ज्याठिकाणी बिश्नोई गँगमधील माणसं त्यांना वैष्णव देवीला नेणार होते. मात्र दोघेही घटनास्थळी पकडले गेले होते. रविवारी यूपी एसटीएफच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या बेहराईचवरून त्याला अटक करण्यात आली होती.





