नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईत आंदोलनात सामील होण्यासाठी हजारो वाहने नवी मुंबईत येत होती. खबरदारीचा उपाय म्हणून जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने उरण जेएनपीटी परिसरात शेकडो वाहने अडकून पडली आहेत. वाहतूक कोंडी वारंवार होत असून याला मुख्यात्वे कारण बेशिस्त पार्किंग आहे. आता यावर कडक धोरण स्वीकारत पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करणे सुरु केले आहे. ही समस्या सर्वाधिक जेएनपीटी आणि उरणकडे जाणाऱ्या मार्गांवर होत आहे.
मराठा आंदोलक प्रचंड मोठ्या संख्येने येणार असल्याची शक्यता असल्याने २९ ऑगस्टपासूनच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली. मात्र त्यामुळे जेएनपीटी मार्गावर मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहने अडकून पडली. रस्त्याच्या एका बाजूला उभी केलेली शेकडो वाहने असल्याने एखादे वाहन बेशिस्तीने उभे केले तरी लगेच वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस बळ कमी असल्याने पोलिसांना सर्व ठिकाणी उपस्थित राहणे जमत नाही. त्यामुळे अखेर सोमवारपासून बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. सोमवारी एकाच दिवसात सातपेक्षा अधिक गुन्हे उरण पोलीस ठाण्यात दाखल झाले. मंगळवारी दुपारपर्यंत पाच गुन्हे दाखल केले आहेत. यात दास्तान फाटा, डी आर टी उड्डाणंपुल परिसर, कोप्रोली नवघर मार्ग, या ठिकाणांचा समावेश आहे. सुदैवाने शीव पनवेल मार्गांवरील वाहतूक त्या मनाने सुरळीत आहे. मात्र येथेही बेशिस्त पार्किंग आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.