पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला कोंढवा भागात राहायला आहेत. १६ फेब्रुवारी रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.
महिलेने सुरुवातीला काही रकम गुंतविली. या रकमेवर त्यांना चांगला परतावा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर गेल्या पाच महिन्यात महिलेने वेळोवेळी ४० लाख २० हजार रुपये जमा केले. रकम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांना मुद्दल दिली नाही. त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकाव संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.





