पुणे : सोमवारी १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मुंबईत देखील सूरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली. यानंतर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनाची पाहणी देखील सुरू आहे.
दिल्लीतील भयानक स्फोटानंतर प्रत्येक ठिकाणी सुरक्षितता बाळगली जात असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिर्डीच्या प्रवेशद्वारावर देखील वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जगप्रसिद्ध असलेल्या साईच्या शिर्डीत देखील सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अनेक शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नवी मुंबई, अशा ठिकाणींची सुरक्षा वाढवण्यात आली. याशिवाय पोलीस यंत्रणांनी या ठिकाणी तपास देखील सुरु केला. तसेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आणि साईंच्या शिर्डीत देखील सुरक्षा वाढवण्यात आली.







