मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी, रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, रविवारी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना ब्लॉकचा सामना करावा लागणार असल्याने, त्यानंतर मध्य रेल्वेने रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘लोकसत्ता’च्या बातमीमुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने, लाखोंच्या संख्येने गणेशभक्त गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात. परंतु, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकांवरील थांबा रद्द करण्याचे नियोजन होते. गणेशोत्सवानिमित्ताने चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकात लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परिणामी, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीसह लालबाग, चिंचपोकळी, करी रोड परिसरातील गणपती दर्शनाला जाणाऱ्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करून, निद्रावस्थेत असलेल्या, गणेशभक्तांचे काही देणेघेणे नसलेल्या मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागे केले. शनिवारी दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली केली.







