वसई : वसई विरार शहरात जंगल परिसर यासह विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने गावठी दारूच्या हात भट्ट्या लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. नुकताच विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने विरार बरफपाडा येथे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली आहे.
वसई विरार शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने जंगल परिसर व कांदळवन भागात दारूच्या हात भट्ट्या लावल्या जात आहेत. त्यातून निर्माण होणारी गावठी दारू ही विविध ठिकाणी वितरित केली जात आहे. दिवसेंदिवस गावठी दारू हातभट्टीचे अड्डे वाढत आहेत.अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली आहेत. नुकताच विरार पूर्व येथील बरफ पाडा, लहानगेपाडा समाज मंदिरा जवळील एका शेतात सुरु गावठी दारूची हातभट्टी लावण्यात आली होती. याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे. कारवाई मध्ये १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ३ हजार लीटर नवसागर गूळ मिश्रित रसायन, २५ लीटर गावठी दारू आणि ती तयार करण्याची साधने यांचा समावेश आहे.







