पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर परिसरात बेकायदा गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
बेकायदा गुटखा तयार करणाऱ्या कारखान्याचा मालक रोहित दुर्गादास गुप्ता (वय २५, रा. थेऊर), कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रतापती (वय ५०, रा. थेऊर), अप्पू सुशील सोनार (वय ४६, रा. कांबळे वस्ती, थेऊर, मूळ रा. उत्तर प्रदेश), दानिश मुस्तकिन खान (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणी काळभोर परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक (पथक दोन) गुरुवारी गस्त घालत होते. थेऊर फाटा परिसरात एका कारखान्यात गुटखा तयार करण्यात येत असल्याची महिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कांबळे वस्ती परिसरातील सुमीत गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकाल. तेथून गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सुगंधी तंबाखू, थंडक, रासायनिक पदार्थ, गुलाबपाणी असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारखान्याच्या परिसरातून तीन वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत एक लाख ३० हजारांची रोकड जप्त केली.







