Categories
महाराष्ट्र मुंबई

मुंबई विमानतळावर क्विक डिलिव्हरी सुरू; आता बेबी केअरपासून औषधांपर्यंत सर्व काही मागवा अगदी जागेवरच!

मुंबई : विमान पकडण्याच्या गडबडीत अनेकदा आपण घाईघाईत घराबाहेर पडतो आणि विमानतळावर पोहोचल्यावर लक्षात येते की, मोबाईलचा चार्जर घरीच राहिलाय किंवा प्रवासात वाचायला पुस्तक घ्यायचे राहून गेले आहे. अशा वेळी प्रवाशांची होणारी धावपळ आता थांबणार आहे. प्रवाशांचा हा अनुभव सुसह्य करण्यासाठी ‘अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड’ (AAHL) आणि देशातील आघाडीची क्विक कॉमर्स कंपनी ‘ब्लिंकिट’ यांनी एकत्र येत मुंबई विमानतळावर एक नवा इतिहास रचला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल २ वर बुधवारपासून (दि. १) भारतातील पहिली ‘इन-टर्मिनल’ क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता विमानतळाच्या आत बसल्या जागी प्रवाशांना हव्या त्या वस्तू अवघ्या काही मिनिटांत उपलब्ध होणार आहेत. या अभिनव उपक्रमांतर्गत, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वरील डोमेस्टिक डिपार्चर एरियामध्ये प्रवास करणारे प्रवासी आता ब्लिंकिट ॲपचा वापर करून ऑर्डर देऊ शकतात. विशेष म्हणजे, ही डिलिव्हरी केवळ विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत मर्यादित नसून, प्रवासी टर्मिनलच्या आत ज्या ठिकाणी असतील; मग ते बोर्डिंग गेट असो, लाउंज असो किंवा फूड कोर्ट; तिथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षितपणे पोहोचवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आता दुकानांमध्ये शोध घेत फिरण्याची गरज उरणार नाही. या सेवेमध्ये प्रवासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ट्रॅव्हल ॲक्सेसरीज, स्नॅक्स, औषधे, पुस्तके आणि बेबी केअर प्रॉडक्ट्सचा समावेश करण्यात आला आहे. विमानतळाच्या कडक सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी, बॅगेतून नेण्यास मनाई असलेल्या काही तरल पदार्थांची (उदा. शीतपेये किंवा ज्यूस) डिलिव्हरी विमानतळाच्या अंतर्गत सुरक्षित साठ्यातूनच केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.