पालघर : सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गांभीर्याने घेत सफाळा पोलिसांनी आता पालकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. १८ वर्षे पूर्ण नसताना पाल्यांच्या हाती वाहन देणे पालकांना महागात पडणार असून, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा आणि किशोर न्याय कायद्यांतर्गत पालकांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये ५० CC पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास २५,००० रुपये दंडाची तरतूद, चालक, वाहनमालक आणि पालकांना ३ वर्षांपर्यंत सश्रम कारावास होऊ शकतो, गुन्हा दाखल झाल्यास संबंधित मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही, संबंधित वाहनाची नोंदणी एका वर्षासाठी रद्द केली जाऊ शकते याप्रकारच्या शिक्षेचा समावेश आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







