नागपूर (सतीश भालेराव) : पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतील मनीषनगर परिसरात” स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार” सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर दिनांक १७.०३.२०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वा. “7-C Wellness Spa” येथे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. सदर कारवाईदरम्यान बोगस ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून तात्काळ छापा टाकण्यात आला असता, स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी सोनम सौरभ अडिगने (वय २८ वर्षे, राहणार प्रधानमंत्री आवास योजना पोलीस ठाणे वाटोळा,नागपूर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपी ही बाहेरील राज्यांतील गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले आहे. छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक महिला ओडिशा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिलांना संरक्षण व पुनर्वसनासाठी सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून रोख रक्कम रुपये ५.०००/- व एक मोबाईल फोन किंमत अंदाजे रुपये १०,०००/- असा एकूण १५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे बेलतरोडी येथे अपराध क्र. ११२/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ४, ५, ७, ८ तसेच बीएनएस कलम १४३ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस उपायुक्त, परिमंडळ नागपूर शहर व सहा. पोलीस आयुक्त, अजनी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बेलतरोडी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अनैतिक, बेकायदेशीर किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.






