पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस-वे) हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स) सेवेचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) देण्यात आले आहे. हा प्रस्ताव फेटाळल्याने आता या महामार्गावरील अपघातग्रस्तांना उपचारासाठी रस्ते मार्गानेच रुग्णालयात दाखल करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर या मार्गावर हवाई रुग्णावाहिका सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी २०१६ पासून चाचपणी करण्यात येत होती. एका खासगी कंपनीने हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’कडे सादर केला. महामार्गावरील वळणावळणाचे रस्ते, डोंगराळ प्रदेश आणि हेलिकॉप्टर उतरविण्यात अडचणी असल्याने प्रति तास सुमारे पाच लाख रुपयांच्या खर्चाचा अंदाज प्रस्तावामध्ये देण्यात आला होता. त्यामुळे हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे ‘एमएसआयडीसी’कडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील म्हणाले, ‘पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हा भौगोलिकदृष्ट्या वळणावळणाच्या घाटरस्त्यातून आहे. हवाई रुग्णवाहिकेला उतरण्यास स्वतंत्र जागा किंवा तळ स्थापन करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात धुके आणि पावसाळ्यात जोरदार पाऊस असल्यास या अडचणींची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.’







