पुणे : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. प्रकल्पासाठी ३२ हजार ४८० झाडे तोडली जाणार असल्याचा दावा होत असून, पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आरोप फेटाळून लावत प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला आहे. कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी परिसरातील सायडोंगर येथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी ६४० एकर वनजमीन देण्यात आल्याचे आणि हजारो झाडे तोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायतीचा ठराव न घेता तसेच स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रकल्प पुढे नेल्याचा आरोपही होत आहे.
माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकारवर टीका केली. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना वृक्षतोडीला परवानगी कोणाच्या दबावाखाली देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासगी कंपनीचे हित जपण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी दिला जात आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. राज्यातील काही भागांत दुष्काळी परिस्थिती असताना जंगलतोड करून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी टीकाही त्यांनी केली. प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी घाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कर्जत दौऱ्यावर जाणार असून, वृक्षतोड सुरू असलेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेत ते काय भूमिका मांडतात आणि पुढील आंदोलनाबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरवले जात असल्याचा आरोप केला. हा प्रकल्प एका दिवसात मंजूर झालेला नसून, त्यासाठी १८ महिने सुनावणी झाल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पडल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नाही; अशी परिस्थिती उद्भवल्यास पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्रात उद्योगांची संख्या वाढत असल्याने विजेची मागणीही वाढणार आहे. ती पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जानिर्मिती आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. सौरऊर्जेची उपलब्धता असूनही संध्याकाळी पाच वाजल्यानंतर विजेची मागणी वाढते. त्या वेळी कोळशावर आधारित वीज वापरल्यास प्रदूषण वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातून तीन हजार मेगावॅट वीज निर्माण होणार असून, सुमारे ४० लाख वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाइतके उत्सर्जन टाळता येईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. प्रकल्पस्थळी तयार होणाऱ्या तलावातील पाणी सुमारे चार लाख लोकांच्या वर्षभराच्या गरजा भागवू शकेल, असेही ते म्हणाले. कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात तीनपट जागा उपलब्ध करून दिल्याचे सांगत, त्या जागेवर ३० हजार आणि प्रकल्पस्थळी ६० हजार, अशी एकूण ९० हजार झाडे लावण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकल्प भीमाशंकर जंगलापासून १६ किलोमीटर आणि मंदिरापासून २० किलोमीटर अंतरावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असेही ते म्हणाले. प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, वृक्षतोडीची परवानगी, स्थानिकांचा सहभाग आणि पुनर्वनीकरणाबाबतच्या दाव्यांवरून वाद कायम आहे. सरकार प्रकल्पाला स्वच्छ ऊर्जेसाठी महत्त्वाचा मानत असताना विरोधक आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे कर्जत प्रकल्पावरील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

