मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा तसेच विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा मांडणाऱ्या ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते. या पुस्तकामध्ये डिसेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. कक्षाची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धती, विविध योजना, राबविण्यात आलेले उपक्रम, लाभार्थ्यांना मिळालेली आर्थिक मदत आणि रुग्णांच्या प्रेरणादायी यशोगाथांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकातून करण्यात आले आहे. शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.
या कॉफी टेबल बुकमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आली आहे. विविध योजनांचे स्वरूप, पात्रता, कायदेशीर तरतुदी, लाभार्थी घटक, अंमलबजावणीची पद्धत आणि कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच कक्षाच्या कामगिरीची आकडेवारी, जिल्हास्तरावर झालेला विस्तार, लोकसहभागातून मिळालेला प्रतिसाद आणि आर्थिक मदत मिळालेल्या रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे अनुभवही पुस्तकात नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय कक्षातील अधिकाऱ्यांचे लेख, संपादकीय मनोगत, मान्यवरांचे शुभेच्छा संदेश आणि पूरक माहितीचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कार्याची व्यापक स्तरावर ओळख निर्माण करणे, अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि शासनाच्या रुग्णसेवेतील योगदानाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करणे हा या कॉफी टेबल बुकचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

