नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात तंत्र-मंत्राच्या आमिषाने एका वकिलाची २० लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू तांत्रिक आणि त्याच्या साथीदाराला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे आरोपींना अखेर पनवेलमधून अटक करण्यात आली. फिर्यादी हे पेशाने वकील असून, त्यांना आरोपी सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग साधू महाराज व त्याचा साथीदार जयदीप दिनेश पामेचा यांनी तंत्र-मंत्राद्वारे पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांनी सीबीडी बेलापूर सेक्टर ८ मधील एका फ्लॅटमध्ये येण्यास सांगितले. पूजाविधीच्या बहाण्याने त्यांनी वकिल आणि त्यांच्या पत्नीला एका खोलीत डांबून ठेवले आणि घरातील मुख्य दरवाजासमोरून कडी लावून २० लाखांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन ते फरार झाले. आरोपी दरवाजा उघडत नसल्याने संशय वाढल्यानंतर वकिल दाम्पत्याने मोठ्या प्रयत्नानंतर स्वतःची सुटका करून घेतली व थेट सीबीडी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी तत्काळ महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत कलम ३(२) अन्वये गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी पनवेलमधील कारंजाडे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचत दोघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून १९ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली असून उर्वरित रक्कमेचा शोध सुरू आहे. पोलिस तपासात आणखी बळी पडलेले लोक समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या भोंदू तांत्रिकांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक उपचार, पैसे दुप्पट होणे, ग्रह-नक्षत्र शांती, अशी कोणतीही अमिषे दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे. अशी फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी केले आहे.





