मुंबई : कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेद्वारे निवड झालेल्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. इच्छुकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. मात्र दिव्यांग कलाकारांना वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आल्याने त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराने कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षे उल्लेखनीय कार्य केलेले असणे आवश्यक असून, वयाने ज्येष्ठ असलेल्या विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच ज्यांची उपजीविका केवळ कला क्षेत्रावर अवलंबून आहे आणि अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही, अशाच कलाकारांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही महामंडळाच्या अथवा नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज करताना वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य किंवा केंद्र शासनाचे संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था अथवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच आवश्यक इतर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन ३१ जुलैपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.






