ठाणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच उपरोक्त संदर्भिय पत्राअन्वये राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे येथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. या अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व अधोरेखित करताना, लोकशाही व्यवस्थेवर दृढ विश्वास ठेवणे, संविधानिक मूल्यांचे पालन करणे, मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे तसेच मतदानाचा हक्क बजावणे, या बाबींविषयी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय किर्ती डोईजोडे, लेखाधिकारी रविंद्र सकपाळ, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे, कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी मनोज देवकर, ग्रामपंचायत अधिकारी हिरामण खाडे तसेच जिल्हा परिषद ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमातून लोकशाही मूल्यांचे संवर्धन, नवमतदारांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच नागरिकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन वाढविणे, हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.







