पुणे : शहरात पावसाळ्यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये संशयित रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासह इतर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात मे महिन्यात डेंग्यूचे २३ संशयित रुग्ण आढळले होते. त्यातील दोन जणांना डेंग्यूचे निदान झाले होते. जूनमध्ये संशयित रुग्णांची संख्या ५९ वर पोहोचली आहे. या वर्षभरात डेंग्यूचे एकूण १८९ संशयित आणि ८ निदान झालेले रुग्ण आढळले आहेत. या वर्षी जानेवारीत ३० संशयित रुग्ण आढळले असून, त्यानंतर फेब्रुवारी ३१, मार्च १९, एप्रिल १९, मे २३ आणि जून ५९ अशी रुग्णसंख्या आहे. या वर्षभरात चिकुनगुनियाचे ८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शहरातील मागील ३ वर्षांतील कीटकजन्य आजारांचा उद्रेक झालेल्या भागांवर आरोग्य विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जास्त रुग्णसंख्या आढळून आलेल्या उद्रेकग्रस्त भागात साथरोग प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य पूर नियंत्रण आराखड्यामधील पाणी साचणाऱ्या ठिकाणी औषध फवारणीचे नियोजनही करण्यात आले आहे, असे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.





