मुंबई : शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने अमेझॉन इंडियाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूरकीशी सहयोग कराराची घोषणा केली. लाकडाचा वापर न करता कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आणि त्यायोगे शेतीतील कचऱ्याचे ज्वलन टाळण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे, त्याचप्रमाणे ‘व्हर्जिन वूड पल्प’चा वापरही यामुळे कमी होऊ शकेल. हे कमी वजनाचे तरीही दणकट पॅकेजिंग साहित्य म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून तयार होणाऱ्या पारंपरिक साहित्यासाठी तसेच प्लास्टिक पिशव्यांसाठी रिसायकल करण्याजोगा आणि घरीच कॉम्पोस्टिंग करण्याजोगा पर्याय आहे.
गव्हाचा पेंढा आणि उसाची चिपाडे यांसारख्या शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर उच्च दर्जाच्या लगद्यामध्ये करून त्यापासून कागदी खोकी-पाकिटे तयार करण्यावर या संशोधनाचा भर असेल. या उत्पादनांची कामगिरी पारंपरिक कागदी पॅकेजिंग साहित्याच्या तोडीची असेल. त्यामुळे भारतातील पिकांचे खुंटे जाळण्याचे प्रमाण कमी करण्यातही मदत होणार आहे आणि एरवी जाळून टाकाव्या लागणाऱ्या कृषी कचऱ्याचे रूपांतर मौल्यवान पॅकेजिंग साहित्यात होणार आहे. आयात केल्या जाणाऱ्या ‘व्हर्जिन वूड पल्प’वरील अवलंबित्वही यामुळे कमी होईल आणि कृषी कचरा बाजारपेठेत विकून शेतकरीही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळवू शकतील. आयआयटी रूरकीच्या पेपर अँड पॅकेजिंग टेक्नोलॉजी विभागासोबतचा हा सहयोग प्रकल्प प्रयोगशाळेतून सुरू होणार आहे, उत्पादनांचा विकास करून त्यांच्या चाचण्या घेण्याचे काम १५ महिन्यांहून अधिक काळापर्यंत चालणार आहे. उत्पादनांच्या दर्जाची चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरच्या टप्प्यात औद्योगिक चाचण्या, पडताळणी प्रक्रिया तसेच व्यावसायिक स्तरावर उत्पादन यांसाठी अमेझॉन सहाय्य करणार आहे.






