पुणे : पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार वर्गवाढ करण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या असल्याची तपासणी करून दहावीपर्यंतच्या वर्गांना मान्यता दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात ३,५०० हून अधिक प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे २.३ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये ११,२२८ शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शाळा प्रामुख्याने चौथी किंवा सातवीपर्यंत आहेत. त्यामुळे चौथी किंवा सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गवाढीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पाटील म्हणाले, ‘शाळांच्या वर्गवाढीच्या मंजुरीचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार वरच्या वर्गात जाणाऱ्या किमान २५ विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. एखादी शाळा आठवीपर्यंत असल्यास नववीचा वर्ग सुरू करण्यासाठी किमान २५ विद्यार्थी असणे गरजेचे आहे. या निकषाची पूर्तता करणाऱ्या शाळांमध्ये दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.’ जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये १०० प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यात रोबोटिक्स प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, एआर-व्हीआर प्रयोगशाळा, खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि कौशल्य विकास प्रयोगशाळा यांचा समावेश असून, प्रत्येक लॅबचा सरासरी खर्च सुमारे १० लाख रुपये असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.







