मुंबई : ऑनलाईन पेमेंट सध्याच्या काळाची गरज बनली आहे. सुट्टे पैसे, वेळ वाचवणे आणि सुरक्षित व्यवहार या सर्व कामांसाठी ऑनलाईन पेमेंट फायदेशीर ठरतात. पैसे बाळगणे, सुट्ट्या पैशांसाठी वाद घालणं, तसेच चोरांपासून तुमचे पैसे सुरक्षित ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे. याच सर्वापासून सुटका मिळवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट पद्धती उपयोगी ठरते. तुम्ही केवळ क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणातच पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट पद्धती अप्ताकालीन परिस्थितीत अतिशय महत्त्वाची ठरते, विशेषत: जेव्हा रुग्णालयातील व्यवहार करायचे असतील. रुग्णालयात पैशांची जुळवाजुळव करताना ऑनलाईन पेमेंट पद्धती अतिशय फायदेशीर ठरते. हाच विचार करून महापालिकेने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात गेल्यावर मोबाईलद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण राहणार नाही. महापालिकेची रुग्णालयेच नव्हे, तर इतर कार्यालयांमध्येही नागरिकांना रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून शुल्क भरण्याची सुविधा देण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल उपक्रमाच्या इंडिया’ पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वित्त विभागाने ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, या निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या महापालिकेच्या विविध रुग्णालये व कार्यालयांमध्ये उपचार शुल्क, प्रमाणपत्रे, नोंदणी तसेच अन्य सेवासाठी नागरिकांना रोख रक्कम भरावी लागते. त्यामुळे खिडक्यांवर मोठ्या रांगा लागतात, वेळेचा अपव्यय होतो आणि व्यवहारांची अचूक नोंद ठेवताना अडचणी निर्माण होतात. अनेकदा सुट्टया पैशांचा प्रश्नही उपस्थित होतो. डिजिटल पेमेंट प्रणाली कार्यान्वित झाल्यास या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्याटप्प्याने ही सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये लागू करण्यात येणार आहे. सध्या संपत्ती कर, पाणीपट्टी यांसारखे काही व्यवहार ‘माय बीएमसी अॅपवरून ऑनलाइन करता येतात, मात्र रुग्णालयांमधील अनेक सेवा तसेच काही कार्यालयीन व्यवहारांसाठी अजूनही रोख व्यवहारांची गरज भासते. ही उणीव भरून काढण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.







