मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या बालकांच्या पालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महापालिकेच्या चार प्रमुख आणि १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांचा जन्मदाखला थेट रुग्णालयातूनच उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच, सेवा हमी कायद्यानुसार जन्म नोंदणी झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जन्म प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याने पालकांना विभागीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. महापालिकेने जन्म आणि मृत्यू नोंदणीचे अधिकार संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारमार्फत ही विनंती भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतर या प्रक्रियेला मंजुरी मिळाल्याने जन्म व मृत्यू नोंदणीचे विकेंद्रीकरण शक्य झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी आता संबंधित रुग्णालयातूनच केली जाणार आहे.
या नव्या व्यवस्थेनुसार पालकांना जन्मदाखल्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्यासाठी विभागीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. आवश्यक लॉग-इन आयडी संबंधित रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यात आली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी सांगितले की, नागरिकांचा वेळ वाचावा आणि सेवा अधिक परिणामकारक व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ केईएम रुग्णालय, बायल नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (सायन), आर. एन. कूपर रुग्णालय तसेच महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळणार आहे. याशिवाय सर जे. जे. रुग्णालयातही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ (सुधारित २०२३) आणि जन्म-मृत्यू नोंदणी नियम, २००० नुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी बंधनकारक आहे. नव्या व्यवस्थेमुळे पालकांना रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वतंत्र पाठपुरावा करावा लागणार नाही आणि जन्म नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

