नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी नाशिकमध्ये कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर गोदातीरावर ५१७ शंखवादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद करत नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. देवमामलेदार पटांगणाजवळ झालेल्या या उपक्रमात ३०३ जणांच्या पूर्वीच्या विक्रमाला मागे टाकत भारताच्या नावावर नवा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित ‘अनंतविजय शंखनाद पथक’ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. यातील २५१ शंखवादक येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी शंखनाद करणार आहेत. भारतीय धार्मिक परंपरेत शुभकार्याच्या प्रारंभी शंखनादाला विशेष महत्त्व असून, या उपक्रमातून नाशिकचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, शंखनाद ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा असून सिंहस्थाच्या मंगलारंभाशी तिची सांगड घालण्याचा हा विशेष प्रयत्न आहे. दरम्यान, २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता, तर यंदा १२ कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपये, तर यंदा विकासकामांसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता गोदावरी तीरावर साडेसहा हजार आदिवासी बांधवांकडून गोदा आरती सादर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

