मुंबई : पावसाळ्यानंतर मुंबई महापालिकेचा माहीम सी फूड प्लाझा पुन्हा पर्यटकांसाठी खुला झाला असून, शनिवारपासून येथे महिला बचत गटांचे खाद्य स्टॉल्स सुरू झाले आहेत. हा प्लाझा दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी नागरिकांसाठी खुला राहणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करताना स्थानिक खाद्यसंस्कृती जपणे आणि कोळी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. माहीम कोळीवाड्यातील हा मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पावसाळ्यात तो तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. उद्घाटनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार, अभिनेते कमलाकर सातपुते, ‘जी उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई, महापालिकेचे अधिकारी आणि महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या. प्लाझामध्ये आकर्षक रोषणाई, सेल्फी पॉइंट, आरामदायी आसनव्यवस्था तसेच स्थानिक कोळी गीतांसह अस्सल सी-फूडचा आस्वाद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेने कोळीवाड्यांचे जतन आणि पर्यटनाला चालना देण्याबरोबरच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला आहे. या उपक्रमासाठी महिलांना मत्स्य उत्पादनावर आधारित विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्या व्यवसाय कौशल्याला चालना मिळावी आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, हा उद्देश आहे. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी या सी फूड प्लाझाला भेट दिली असून, कोळी खाद्यसंस्कृतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माहीम चौपाटीलगत उभारण्यात आलेल्या या प्लाझामध्ये पर्यटकांसाठी आकर्षक वातावरण, छायाचित्रणासाठी विशेष जागा आणि पारंपरिक कोळी पदार्थांची रेलचेल आहे. मुंबईतील कोळीवाड्यांची समृद्ध परंपरा आणि खाद्यसंस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे भेट देऊन स्थानिक कोळी संस्कृती आणि खाद्यपरंपरेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

