नागपूर : होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस परिमंडळ क्रमांक चार यांच्या वतीने ‘मुदेमाल परतावा सोहळा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत चोरीस गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत पोलिसांनी तब्बल ८२ मोबाईल फोन नागरिकांना परत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १२ लाख ३० हजार रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम पोलीस उपआयुक्त रश्मिता राव (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. भारत सरकारच्या CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल ट्रेस करून हे मोबाईल उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शोधून काढण्यात आले. होळीच्या सणाच्या निमित्ताने नागरिकांना त्यांची हरवलेली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी नागपूर पोलिसांचे आभार मानले. तसेच पोलिसांनी केलेल्या या कार्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित भारत सरकारच्या CEIR पोर्टलवर माहिती नोंदविण्याचे आवाहन पोलिसांनी केले, ज्यामुळे मोबाईल ट्रेस करण्यात पोलिसांना मदत होते. हा कार्यक्रम पोलीस उपआयुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, सक्करदरा विभाग, अजनी विभाग तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.







