अहिल्यानगर : शहरातील झेंडीगेट परिसरात घर व घराच्या आवारात पत्र्याचे शेड टाकून उभारण्यात आलेले ५ अवैध कत्तलखान्यांच्या बांधकामांवर आज, गुरूवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. पत्र्याचे मोठे व पक्के शेड करून केलेली बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
दोन दिवसांपूर्वी कोठला परिसरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत व रस्त्यावर गोवंश जनावरांचे अवशेष आढळून आले होते. याविरोधात आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनात आमदार जगताप यांनी महापालिकेला कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डांगे व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने झेंडीगेट परिसरात पाहणी केली होती. पोलिसांकडून कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या बांधकामाचा अहवाल महापालिकेकडे यापूर्वीच दाखल करण्यात आला होता. त्यातील ५ पत्र्याच्या शेडची कत्तलखान्याची बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीही झेंडीगेट भागातील दोन कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते.







