मुंबई : हार्बर मार्गावरील कुर्ला – टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे साडेचौदा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड- मानखुर्ददरम्यानची लोकल सेवा बंद राहील.
शनिवारी रात्री ११.०५ ते रविवारी दुपारी १.३५ पर्यंत हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक आहे. यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. ब्लॉकपूर्वी शेवटची पनवेल- सीएसएमटी लोकल रात्री ९.५२ वाजता सुटेल. डाऊन हार्बर मार्गावरील वाशी/बेलापूर/पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.१४ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल रविवारी दुपारी १.०९ वाजता पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने रवाना होईल. डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीहून रविवारी दुपारी १.३० वाजता सुटेल. ब्लॉकदरम्यान पनवेल- मानखुर्द- पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.




