मुंबई : गॅस टंचाईमुळे नागरिकांनी स्वयंपाक करण्यासाठी पर्यायी साधनांकडे धाव घेतली आहे. त्याचा परिणाम ऑनलाइन बाजारपेठेवर दिसत असून अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ब्लिंकिटसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इंडक्शन स्टोव्हची विक्री झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी म्हणजेच आज सकाळपर्यंत अनेक लोकप्रिय कंपन्यांचे इंडक्शन स्टोव्ह आऊट ऑफ स्टॉक झाल्याचे दिसून येत आहे.
इस्रायल – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, देशभरात अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाक करण्यासाठी विद्युत उपकरणांचा पर्याय निवडला आहे. काही ठिकाणी चूल, तर काही ठिकाणी कोळशावर स्वयंपाक केला जात आहे. अशातच घरगुती सिलिंडर बुकिंगमध्येही अडथळे येत असल्याने नागरिकांनी स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांचा वापर सुरू केला असून विद्युत इंडक्शन स्टोव्हची मागणी झपाट्याने वाढली आहे. विक्रीत ३०० टक्क्यांची वाढ गेल्या दोन तीन दिवसांपासून स्थानिक दुकानांसह अनेकांनी इंडक्शन स्टोव्हच्या खरेदीसाठी ऑनलाईन संकेतस्थळांना पसंती दिली आहे. आकर्षक सवलतीत घरपोच सेवा मिळत असल्याने अमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टो, ब्लिंकिट आदींकडे ग्राहक वळले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे या संकेतस्थळांवर मिल्टन, पिजन, प्रेस्टिज, फिलिप्स, बजाज, हावेल्स आदी लोकप्रिय ब्रँडच्या इंडक्शन स्टोव्हची झपाट्याने विक्री झाल्याने बहुतांश मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक झाल्याचे निदर्शनास येत आहे.







