वसई : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाया होत आहेत. रविवारी पहाटे (२६ ऑक्टोबर) नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात असलेल्या अमली पदार्थांची(ड्रग्ज) निर्मिती करणार्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाने धाड टाकली आहे. यात सुमारे १३ कोटी ४४ लाख ५३ हजार ७०० रुपयांचे मेफेड्रोन नावाचे अमली पदार्थ आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.यात चार ड्रग्ज विक्रेत्यांचा आणि एका उत्पादकाचा समावे श आहे.सोहेल अब्दुल ररुफ खान,मेहताब शेरअली खान, इकबाल बिलाल शेख,मोहसिन कयुम सैय्यद, आयुबअली अबुबकर सिद्दीकी अशी आरोपींची नावे आहे.
५ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांना माहिती मिळाली की एक माणूस कुर्ल्यात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येत आहे. तपास पथकाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून ५७.८४ ग्रॅम एमडी जप्त केले. त्यानंतर मुंबईतील टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपीच्या अनेक साथीदारांची नावे उघड झाली. त्यानंतर मुंबई आणि मिरा रोड येथून इतर चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळले की पेल्हारमध्ये एक ड्रग्ज फॅक्टरी कार्यरत आहे. जिथून एमडी ड्रग्ज मुंबई आणि इतर महाराष्ट्रात पाठवले जाते. यानंतर, पोलिसांनी रविवारी पेल्हारमध्ये छापा टाकला आणि ६.६७५ किलो एमडी ड्रग्ज, कच्चा माल आणि ड्रग्ज उत्पादन उपकरणे जप्त केली. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. याची माहिती अमली पदार्थाच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स च्या पथकाने पेल्हार येथे कारखान्यावर छापा टाकला.या कारवाई दरम्यान मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठीचे साहित्य व काही तयार अमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. जवळपास जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत १३ कोटी ४४ लाख ५३ हजार ७०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.







