मुंबई : मुंबईची नवीन जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ ‘ॲक्वा लाईन’ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (MMRC) नियमित प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी विशेष ‘सवलतीच्या पास’ची घोषणा केली असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक स्वस्त आणि सुलभ होणार आहे.
कोणाला किती सवलत मिळणार?
१. विद्यार्थी आणि दिव्यांगांना २५% सूट:
शालेय विद्यार्थी (इयत्ता १२ वी पर्यंत) आणि दिव्यांग प्रवाशांना मासिक पासवर (४५ आणि ६० ट्रिप) तिकीट दरात २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) असणे आवश्यक आहे.
२. नियमित प्रवाशांसाठी सवलत:
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन प्रकारचे सवलतीचे पास उपलब्ध आहेत. (हे दोन्ही पास ३० दिवसांसाठी वैध असतील.)
- ४५ ट्रिप पास: एकूण भाड्यावर १० टक्के सवलत.
- ६० ट्रिप पास: एकूण भाड्यावर १५ टक्के सवलत.
३. पर्यटकांसाठी खास ‘अनलिमिटेड‘ पास:
मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना परवडणाऱ्या दरात ‘ट्रॅव्हल कार्ड’ देण्यात येणार आहे.
- १ दिवसाचा पास: २८० रुपये (अमर्यादित प्रवास).
- ३ दिवसांचा पास: ७०० रुपये (अमर्यादित प्रवास).
हे सर्व सवलतीचे पास प्रवासी ‘MetroConnect3’ या मोबाईल ॲपवरून किंवा मेट्रो स्टेशनवरील तिकीट खिडकीवरून खरेदी करू शकतात. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एनसीसीएम कार्डवर (NCMC) या सवलती प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मेट्रो-३ च्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशाला मोठा आधार मिळणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







