मुंबई : १२७ जणांच्या बँक खात्यामधून तब्बल १६ कोटी रूपये लाटणाऱ्या मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्याला ईडीने बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद जंक्शनवर एका धावत्या ट्रेनमध्ये ईडीने सापळा रचत आरोपी हितेश सिंगला याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश हा बँक ऑप इंडियाच्या वांद्रे येथील टर्नर रोडवरील शाखेमध्ये कार्यकरत होता. सिंगला याने शिताफिने १२७ बँक खातेदारांच्या पैसावर डल्ला मारला. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन, मृत व्यक्ती आणि निष्क्रिय किंवा निष्क्रिय खात्यांचा समावेश आहे.
आरोपी सिंगला याने खातेदारांच्या परवानगीशिवाय तब्बल १६ कोटी रूपये लंपास केले. मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाती, बचत बँक (एसबी) आणि चालू खात्यामधून सिंगला याने थोडे थोडे असे १६ कोटी रूपयांवर डल्ला मारला. सिंगला याने १२७ खातेदारांचे पैसे चोरून आपल्या एसबीआयमधील खात्यात ट्रान्सफर केले होते. ईडीकडून याबाबतचा तपास केला जात आहे. ईडीने यामध्ये सहभागी असलेल्या आणखी एका बँक अधिकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. सिंगला याने त्या अधिकाऱ्याला १.५ कोटी रूपये दिले होते. बँकेत ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सिंगला याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बँकेने त्याचे निलंबन केले होते. सिंगला याच्यावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सिंगला गेल्या काही दिवसांपासून फरार होता. ईडीने त्याचा शोध सुरू केला होता. सिंगला अहमदाबादला येणार असल्याची टीप ईडीला मिळाली. सिंगला उज्जैनवरून अहमदाबादला येणार असल्याची माहिती मिळताच ईडीने फिल्डिंग लावली. इंदूर-वेरावळ महामना एक्सप्रेसमध्ये ईडीने सापळा रचला. अहमदाबादमधील स्थानिक ईडीसोबत संपर्क करत ईडीने सिंगला याला बेड्या ठोकल्या.







