मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे – कुर्ला संकुल येथील एका भूखंडाचा विकास ‘सिटी पार्क’ नावाने मनोरंजन केंद्र म्हणून केला आहे. मात्र योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी हे मनोरंजन केंद्र वापरात नाही. या दुर्लक्षित जागेचा आता योग्य तो वापर करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. या क्रीडा संकुलात नागरिकांसाठी खानपानासह इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीए बीकेसीत विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांचा विकास करीत आहे. रस्ते प्रकल्प राबवले जात आहेत. तर दुसरीकडे नागरिकांसाठी मनोरंजनासाठी सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग एक म्हणून बीकेसीतील एका मोठ्या भूखंडावर एमएमआरडीएने ‘सिटी पार्क’ नावाने मनोरंजन केंद्र उभारले. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती, खेळणी उपलब्ध होती. तर फेरफटका मारण्यासाठी जागा होती. खानपानाची सुविधा होती. मात्र मागील काही वर्षांपासून या ‘सिटी पार्क’कडे प्रचंड दुर्लक्ष झाले. देखभाल-दुरुस्तीऐवजी सिटी पार्कचा वापर नागरिकांना करताच येत नसल्याचे चित्र आहे. आता एमएमआरडीएने ‘सिटी पार्क’चा विकास क्रीडा संकुल म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २,४७,००० चौरस फूट जागेवर क्रीडा संकुल विकसित केले जाणार आहे.
येथे क्रिकेट, फुटबॉल टर्फ, पिकलबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट, रनिंग ट्रॅक, फिटनेस झोन, आसन व्यवस्था आणि प्रकाशयोजना असलेल्या मल्टी-स्पोर्ट कॉम्प्लेक्स आदी सुविधांचा त्यात समावेश असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन आणि क्रीडा सुविधा भाड्याने देऊन महसूल मिळविण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा असणार आहे. त्याचबरोबर येथे एक मोठे रेस्टाॅरन्ट आणि दोन उपहारगृहही असणार आहे. या क्रीडा संकुलाचा वापर सर्वसामान्य नागरिक, बीकेसीतील कंपन्यांतील कर्मचारी आदींना करता येणार आहे. बीकेसीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) मैदान असून येथे अनेक क्रीड सुविधा उपलब्ध आहेत. मात्र या मैदानात केवळ सदस्यांनाच प्रवेश आहे. त्यामुळे इतरांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. पण ‘सिटी पार्क’ येथे क्रीडा संकुल कार्यान्वित झाल्यास त्याचा वापर सर्वांनाच करता येणार आहे. या क्रीडा संकुलासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या निविदा लवकरात लवकरच अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून क्रीडा संकुल उभारून तात्काळ कार्यान्वित करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. दरम्यान हा भूखंड १० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराला भाडेतत्वावर दिला जाणार आहे. तर देखभाल-दुरूस्तीचा जबाबदारीही कंत्राटदारावरच असणार आहे.







