मुंबई : धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या भागाची शहराच्या अन्य भागाशी थेट जोडणी देण्यासाठी उपाययोजना करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. त्यानुसार धारावीमध्ये मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेणारी बैठक घेतली होती. यामध्ये मल्टी ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यासाठी एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला नुकतीच मान्यता मिळाली असून एमएमआरडीए नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. या प्रकल्पात एमएमआरडीएला मेट्रो, रेल्वे, बस आणि वाहतूकीच्या अन्य पर्यायांना एकाच छताखाली आणून त्यांचा एकमेकांना पूरक आणि सहयोगी अशा पद्धतीने विकास करावा लागणार आहे. धारावीतून मेट्रो ३ मार्गिका जात आहे. तसेच मेट्रो ११ मार्गिकाही याच भागाजवळून जाणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर यांना अधिक जवळ आणणाऱ्या या मेट्रो मार्गिकांवर प्रवाशांना सहजरित्या पोहोचता येईल, या अनुषंगानेही उपाययोजना कराव्या लागतील. एमएमआरडीएकडून याबाबतचा आराखडा तयार केला जाईल. या आराखड्याला धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) मंजुरी दिल्यानंतर त्यानुसार एमएमआरडीएला या मल्टी ट्रान्सपोर्ट हबचा विकास करावा लागणार आहे.







