ठाणे : डोंबिवलीतील एका मराठी तरुणीच्या जिद्दीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला पाठिंबा आणि शब्द पाळल्याचे सुखद चित्र समोर आले आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत ‘शॉरमा’ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एकता सावंत या मराठी उद्योजिकेला हक्काचा स्टॉल मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, जे त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे. ४ फेब्रुवारी रोजी स्वतः अविनाश जाधव यांच्या हस्ते या नवीन शॉरमा स्टॉलचे लोकार्पण करण्यात आले.
काही काळापूर्वी एकता सावंत या मराठी तरुणीला आपला व्यवसाय करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यावेळी मनसेच्या वतीने त्यांना मदतीचा हात देण्याचे आणि स्वतःचा अधिकृत स्टॉल मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. केवळ आश्वासन न देता, प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करत अविनाश जाधव यांनी एकता यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यामुळे मराठी तरुणांनी व्यवसायात उतरावे, या मनसेच्या भूमिकेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाल्याचे बोलले जात आहे. आपल्या स्वप्नातील स्टॉल साकार झाल्यानंतर एकता सावंत यांनी समाज माध्यमांद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “विकासाचे दुसरे नाव म्हणजे अविनाश जाधव, तुम्ही मला खूप मदत केली, त्याबद्दल धन्यवाद.” विशेष म्हणजे, एकता सावंत यांच्या विनंतीनुसार आणि आदरापोटी या शॉरमा स्टॉलवर राज ठाकरे यांचे छायाचित्र डौलाने लावण्यात आले आहे. हे छायाचित्र त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत असल्याचे त्यांनी नमूद केले. डोंबिवलीतील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. “मराठी माणसाने केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातही आपले नशीब आजमावावे,” ही भूमिका मनसे सातत्याने मांडत असते. एकता सावंत यांच्या यशाने इतरही मराठी तरुण-तरुणींना प्रेरणा मिळणार आहे. एका मराठी उद्योजिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या स्टॉलच्या उद्घाटनामुळे एकता सावंत यांच्या व्यावसायिक प्रवासाला आता अधिकृत आणि भक्कम पाठबळ मिळाले आहे.





