रत्नागिरी : लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नंदकुमार रविंद्र पांचाळ याला ताब्यात घेतले आहे.
दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी ४५ वर्षीय सुरेश रामचंद्र पडये यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, मृतदेहावरील जखमा आणि घटनास्थळावरील रक्ताचे डाग पाहता हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी तातडीने एक विशेष पथक नियुक्त केले. तपास पथकाने घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले आणि परिसरातील गोपनीय माहितीच्या आधारे नंदकुमार पांचाळ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. मयत सुरेश पडये यांनी शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून, राहत्या घरातच त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.






