मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबईतील शाळकरी मुलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आता ‘बेस्ट’ (BEST) बसने मोफत प्रवास करता येणार आहे. हा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश (Uniform) घातलेला असणे आवश्यक आहे किंवा त्यांच्याकडे शाळेचे अधिकृत ओळखपत्र (ID Card) असणे गरजेचे आहे. प्रामुख्याने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि पालकांवरील प्रवासाचा आर्थिक भार कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या विशेष योजनेसाठी अर्थसंकल्पात सुमारे ८ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्या भागात नियमित बस सेवा उपलब्ध नाही, तिथे पालिकेतर्फे विशेष बसेसची सोय केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नवीन योजनेअंतर्गत, महापालिका शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘चलो कार्ड’ वितरित केले जात आहेत.
- शाळेमार्फत विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून हे कार्ड दिले जाते.
- हे कार्ड जवळ असल्यास आणि शाळेचा गणवेश घातलेला असल्यास विद्यार्थी मोफत प्रवास करू शकतात.
जर तुम्ही खासगी शाळेत असाल किंवा तुम्हाला नियमित पास हवा असेल, तर कोणत्याही जवळच्या बेस्ट बस डेपोवर (Bus Depot) सवलतीचा अर्ज (Concession Form) उपलब्ध असतो. अर्जावर विद्यार्थ्याचा फोटो लावून तो शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित (Stamp and Signature) करून घ्यावा लागतो.
कागदपत्रे :
- शाळेचे ओळखपत्र (ID Card).
- दोन पासपोर्ट साईज फोटो (शाळेच्या गणवेशात असणे आवश्यक).
- रहिवासी पुरावा (उदा. आधार कार्डची झेरॉक्स).
प्रमाणित केलेला अर्ज पुन्हा बस डेपोमधील ‘पॉइंट ऑफ सेल’ (PoS) काउंटरवर जमा केल्यावर तुम्हाला स्मार्ट कार्ड/पास दिला जातो.







