पुणे : पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये पुन्हा एकदा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा बळी गेला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड येथे बिबट्याने रोहन विलास बोम्बे (वय १३) या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला ऊसाच्या शेताजवळ किंवा गावाच्या परिसरात घडला असल्याचे सांगितले जात असून चिमुकल्याच्या मृत्यूनंतर गावकरी आक्रमक झालेत. गावात अलीकडील काळात बिबट्याच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील या भागात बिबट्यांची दहशत वाढली असून, गेल्या काही महिन्यांत अनेक मृत्यू झाले आहेत.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या पेट्रोलिंग वाहनाला आग लावली आणि वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला केला. ग्रामस्थांनी “बिबट्या दिसताच गोळ्या घाला” अशी मागणी केली आहे. गेल्या १५ दिवसांत या भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने तणाव वाढला आहे. महाराष्ट्र वनविभागाने या बिबट्याला “नरभक्षक” घोषित केले असून, दिसताच ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वीच्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या ५ वर्षांच्या बिबट्याला आधीच ठार मारण्यात आले आहे. आता या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी पाच शार्पशूटर्स नेमण्यात आलेत.







