कोकण : कोकणातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता आठ मेल एक्स्प्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. हा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची टप्प्याने अंमलबजावणी २ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ११ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
या आठ एक्स्प्रेस कोकणातून जात होते. मात्र, या गाड्यांना कणकवली आणि सिंधुदुर्गाचा थांबा नव्हता. या मुख्य स्थानकांवर थांबा नसल्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. यासाठी प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी अनेकदा २ स्थानकांवर थांब्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अखेर मागण्यांना हिरवा कंदील दाखवला. सिंधुदुर्ग स्थानकावर मरूसागर एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२९७७/७८ आणि एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेस यांना दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. तर, कणकवली स्थानकावर हिसार कोइंबतूर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी क्रमांक २२४७५/७६ आणि गांधीधाम – नागरकोईल एक्स्प्रेस गाडी क्रमांक १६३३५/३६ या दोन्ही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.







